पाल येथील “सह्याद्रीच्या छाव्यां” चा साताऱ्यात सत्कार
ईलाही शेख

सातारा : ‘माझे सासरे शेख सय्यद मास्तर हे सर्कसीत काम करत होते, माझी पत्नी हसिना शेख हिचा जन्मही सर्कसीत झाला. अनेक वर्षे सर्कसीत काम केले, सर्कसीतील अनेक आठवणी मनात घट्ट रुजल्या आहेत. आमचा झालेला सन्मान आनंददायी होता अशा शब्दात पाल (ता. कराड) येथील बादशाहभाई शेख यांनी आपल्या सर्कसीतील आठवणी साताऱ्यातील आयोजीत मराठी साहित्य संमेलनावेळी शाहू कला मंदिरात सांगीतल्या.
सातारा येथील शाहू कला मंदिरात आयोजीत मराठी साहित्य संमेलनावेळी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत आणि मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या शुभहस्ते सर्वप्रथम उपस्थित सर्वांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ आणि सातारी कंदी पेढे देवून सत्कार करण्यात आला.
हा सत्कार सोहळा म्हणजे केवळ एक सन्मान नव्हता, तर सर्कसच्या पडद्यामागे काम करणाऱ्या या अज्ञात नायकांच्या निष्ठेचा गौरव होता. सर्कस आमच्या उदरनिर्वाहाचे साधन होती, आज ती सुरू नसली तरी आठवणी विसरता न येणाऱ्या आहेत असे पालीचे बाळासाहेब काळभोर यांनी सांगीतले. शिवाय प्रत्येकाने आपले मनोगत व्यक्त केले.
एकेकाळी सर्कसच्या दुनियेला आपलं आयुष्य म्हणणाऱ्या आणि वाघिणीच्या बाळंतपणालाही मदतीचा हात देणाऱ्या खंडोबाची पाली, तालुका कराड येथील छाव्यांचा नुकताच सत्कार समारंभ संपन्न झाला. हजारो लोकांच्या जीवनात आनंदाचे क्षण भरून वार्धक्याकडे झुकलेल्या या कलाकारांना मराठी साहित्य संमेलनात जुन्या आठवणी मांडण्याचा योग मिळाला.
एकेकाळी जगप्रसिद्ध असलेल्या ग्रेट रॉयल सर्कस मध्ये या वीरांनी आपलं तारुण्य ओतलं, पोटाची खळगी भरण्यासाठी त्यांनी आपलं घर सोडलं आणि सर्कसचा तो भव्य डोलारा सांभाळण्यासाठी स्वतःला वाहून घेतलं. फक्त तंबू उभारण्याचं कामच नाही तर हत्ती, घोडे, उंट, वाघ, सिंह, अस्वल अशा अनेक प्राण्यांची त्यांनी निष्ठेने सेवा केली.
यातील हृदयस्पर्शी गोष्ट म्हणजे जेव्हा वाघीण बछड्याला जन्म द्यायची तेव्हा हेच ते ”सह्याद्रीचे छावे” होते जे त्या वाघिणीचे बाळंतपण करायचे आणि बछड्याचे सुद्धा सांभाळ करायचे. आज सर्कशीचे ते दिवस मागे पडले असले तरी त्यांच्या मनात सर्कसीतील केलेल्या कामाच्या आठवणी अजून सुध्दा ताज्याच आहेत.
शेख पुढे म्हणाले की, मलेशिया, सिंगापूर, इंडोनेशिया, बोर्निओ आदि देशात जहाजाने किंवा विमानाने केलेल्या प्रवासाची आठवण आजही त्यांच्या डोळ्यात चमकतात. या पालीच्या सुपुत्रांची विश्वास पाटील यांनी आपल्या “ग्रेट कांचना सर्कस” या पुस्तकात व्यथा मांडली होती. याच वीरांचा गौरव येथील शाहू कला मंदिरात करण्यात आला. हा सन्मान त्यांच्यासाठी अधिकच आनंददायी ठरला असल्याचे प्रत्येकाने सांगितले.



