बालसंस्काराचे बाळकडू अजन्म टिकतात : प्रा. गोविंदराव दाभाडे
आकुर्डीतील सरस्वती बालक मंदिराची पालकसभा व कार्यशाळा

आकुर्डी/प्रतिनिधी : बालपणी विद्यार्थ्यांमध्ये रुजवलेले संस्काराचे बाळकडू हे चिरंतन व अजन्म टिकणारी गोष्ट आहे. या संस्काराबरोबरच विद्यार्थ्यांच्या विविध आवडीनिवडी जोपासत पाल्यामध्ये छंदाची अभिरुची निर्माण करणे गरजेचे आहे. शिक्षण, उत्तम संस्कार, छंद आणि अभ्यासामध्ये विद्यार्थ्यांची गोडी अत्यंत महत्त्वाची आहे. या गोष्टीतून विद्यार्थी घडविण्याची ही पालक म्हणून आपण जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असे आवाहन नवनगर शिक्षण मंडळाचे संस्थापक प्रा. श्री. गोविंदराव दाभाडे सर यांनी पालकांना केले.
आकुर्डी येथील नवनगर शिक्षण मंडळाच्या श्री सरस्वती बालक मंदिरात आयोजित पालकसभेच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी सरस्वती विद्यामंदिराचे मुख्याध्यापक श्री.राजू माळे,पालक प्रतिनिधी श्री. दयानंद गोंडगाव, बालक मंदिराच्या शिक्षिका सौ. शांता हराळे, स्वाती पाटील- जाधव, शिक्षक व पालक उपस्थित होते.

रूढी, परंपरा, अध्यात्म, उत्तम संस्कार, चांगल्या सवयी, दैनंदिन कामे, आवड, छंद, अभ्यासाबरोबरच सुदृढ आरोग्य, आहार या गोष्टीकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे. घरात व समाजात व परिसरात घडणाऱ्या वाईट गोष्टींचे परिणाम विद्यार्थ्यांवरती होतात. पालकांनी आपले कौटुंबिक, सामाजिक वातावरण उत्तम राहील, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे, यावेळी अभिनयासह गोष्ट, बालगीते गायन करून सादरीकरण केले.
शाळा हे संस्काराचे केंद्र आहे, शिस्त आणि नियमितपणा, अभ्यास हा शिक्षणाचा आत्मा आहे, असे प्रतिपादन यावेळी श्री. दाभाडे सर यांनी केले. पालक सभेची सुरुवात प्रतिमापूजन व ईशस्तवनाने करण्यात आली. यावेळी खास पालकांसाठी रांगोळी प्रशिक्षण कार्यशाळा सौ. सारिका आस्मर यांनी घेतली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. शांता हराळे यांनी तर सूत्रसंचालन स्वाती पाटील- जाधव यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अमोल गुंड, श्री. कैलास कोशिरे, श्री. प्रकाश कोळप, प्रतिमा काळे यांचे सहकार्य लाभले.




