महात्मा गांधी विद्यालयात स्वातंत्र्य दिनाचा दिमाखदार सोहळा संपन्न
लतिफ शाह, सर

राजगुरुनगर, दि. १५ : खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचालित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात भारतीय स्वातंत्र्याचा ७९ वा स्वातंत्र्यदिन अतिशय दिमाखदार सोहळ्यात व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव एअर कमोडर गणेश जोशी, संचालक कैलास सांडभोर, प्रदीप कासवा, रेखाताई क्षोत्रीय, उमाताई सांडभोर, बाळासाहेब सांडभोर, संदीप भोसले, स्वानंद खेडकर, राहुल कुंभार, व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे, प्राचार्या संध्या कांबळे, तीनही विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, पर्यवेक्षक, माजी अध्यापक, ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी, विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पाहुण्यांना सलामी देण्यात आली. त्यानंतर खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव एअर कमोडर गणेश जोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी राष्ट्रगीत, राज्यगीत व झेंडागीत सादर केले. महात्मा गांधी विद्यालयाचे एन.सी.सी पथक, तीनही विद्यालयाची स्काऊट गाईड पथक, घोष पथक यांनी संचलन केले. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांची देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत घेण्यात आली.

खेड तालुका एज्युकेशन सोसायटीने अद्ययावत व संपूर्ण सुविधांनी सुसज्ज तयार केलेल्या मैदानाचे उद्घाटन संस्थेचे मान्यवर पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या आदेशानुसार ज्येष्ठ नागरिक अत्याचार जागृती दिनानानिमित्त ‘मी ज्येष्ठ नागरिकांवर कोणताही अन्याय अत्याचार करणार नाही व करु देणार नाही’ अशा स्वरूपाची शपथ सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली. याप्रसंगी खेड तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

हुतात्मा राजगुरू पुतळ्यापर्यंत विद्यालयाच्या पथकांनी संचलन केले. इंग्रजी माध्यम विद्यालय व शेठ केशरचंद पारख विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी गावातून प्रभात फेरी काढली. संस्थेच्या संचालिका रेखाताई क्षोत्रीय व पदाधिकारी स्वानंद खेडकर यांच्या प्रयत्नातून राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने संचालन पथकातील विद्यार्थ्यांना जवळपास एक हजार बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आले.




