
चाफळ/प्रतिनीधी : आजअखेर जोरदार पडलेल्या पावसामळे गावातील पेरणी झालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. याची दखल घेऊन शासनाने बाधित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी व ओला दुष्काळ जाहीर करावा, असा ठराव शिंगणवाडी ग्रामसभेत करण्यात आला.

शिंगणवाडी, ता. पाटण येथे सरपंच शंकरराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. ग्रामविकास अधिकारी सचिन कोचरे यांनी मागील सभेचा इतिवृत्तांत वाचून कायम केला. यावेळी ग्रामसभेला तलाटी दुधगावकर, ग्रामपंचायत सदस्य अजित पवार, अंगणवाडी सेविका वर्षा पवार, भारती पवार, पोलीस पाटील उमेश पवार, लक्ष्मण पवार, विजय पवार, प्रदीप पवार, सतीश पवार उपस्थित होते.
ग्रामसभेत मतदारयादीतील नावे कमी करणे व नावे वाढविणे या संदर्भात चर्चा करण्यात आली. शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावे, असेही आवाहन करण्यात आले. यासाठी गावात कॅम्प आयोजित करण्याचे ठरविण्यात आले. याशिवाय गावातील विविध विकास कामाबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांच्या बांधावरील झाडांची ७/१२ वर नोंद करावी, अशी ही मागणी काही ग्रामस्थांनी केली. यावेळी ग्रामस्थ, महिला, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




