चाफळ येथे येतंय ‘गढूळ’ पाणी

चाफळ/उमेश सुतार : चाफळ येथील श्रीराम पेठेतील सार्वजनिक नळ पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन मधून गेल्या पंधरा दिवसापासून आळ्या व दूषित पाणी येत आहे. ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत असून प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्यास आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा न केल्यास ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा रामपेठ चाफळ येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
सध्या चाफळ ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाळ संपला असल्याने या ठिकाणी प्रशासनाची नेमणूक केली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून श्रीराम वार्डातील नळाच्या पाण्यातून लाल रंगाच्या आळ्या व गढूळ पाणी येत आहे. दहा दिवसापूर्वी श्रीराम वार्डातील ग्रामस्थांनी ग्रामपंचायतमध्ये जाऊन याबाबत ग्रामसेवक राजेंद्र चोरगे यांना याची माहिती दिली होती. त्यानुसार त्यांना कर्मचाऱ्यांना सूचना देत पाईपलाईन खोदून आळ्या कोठून येत आहेत याची माहिती घेतली मात्र अद्याप अळ्या नेमक्या कोठून पाण्यात येत आहे ते कर्मचाऱ्यांना मिळून आले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने सदरच्या पाईप बदलून देण्याचे आश्वासन दिले आहे.
मात्र अद्यापही पाईप न बदलल्याने पुन्हा दूषित पाणी नळाला येऊ लागले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.



