बिबट्याचा डॉबरमॅनवर दुसऱ्यांदा हल्ला
चाफळ येथील घटना, पाळीव कुत्रा गंभीर जखमी, वनविभागाचे दुर्लक्ष

चाफळ (उमेश सुतार) : चाफळ, ता. पाटण येथे लोकवस्तीत बिबट्याचा चांगलाच संचार वाढला आहे. बिबट्याकडून पाळीव जनावरांवर हल्ले होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. दोनच दिवसांपूर्वी रात्री साडे बारा वाजण्याच्या सुमारास बिबट्याने घराबाहेर बांधलेल्या डॉबरमॅन जातीच्या पाळीव कुत्र्यावर दुसऱ्यांदा हल्ला केल्याची घटना घडल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. या हल्ल्यात कुत्रा दुसऱ्यांदा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, याकडे वनविभागाच्या अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असून या बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
चाफळ येथील तंटामुक्ती अध्यक्ष विनोद साळुंखे यांचा डॉबरमॅन जातीचा कुत्रा घराबाहेर बांधलेला होता. मंगळवारी रात्री घरातील सर्वजण झोपी गेले असताना रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास संरक्षक भिंतीवरून आत आलेल्या बिबट्याने घराबाहेर बांधलेल्या डॉबरमॅन जातीच्या कुत्र्यावर दुसऱ्यांदा हल्ला केल्याची घटना घडली. कुत्र्याच्या आवाजाने साळुंखे कुटुंबीय जागे होऊन घराबाहेर आले असता बिबट्याने कुत्र्याला सोडून पळ काढला. या हल्ल्यात हा कुत्रा गंभीर जखमी झाला आहे. काही दिवसांपूर्वी याच कुत्र्यावर बिबट्याने हल्ला करीत त्याला जखमी केले होते. मात्र साळुंखे यांनी त्याच्यावर योग्य ते उपचार केल्याने तो आता कुठे तरी सावरत होता. त्यातच बिबट्याने दुसऱ्यांदा हल्ला केल्याने डॉबरमॅन गंभीर जखमी झाला आहे. या प्रकाराने साळुंखे कुटुंबिय भयभीत झाले आहे.
बिबट्याचा गावात संचार वाढल्याने बिबट्याची दहशत कायम
बिबट्याचा गावात संचार वाढल्याने बिबट्याची दहशत कायम राहिली आहे. मात्र वनविभागाकडून याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात असल्याने वनविभागाच्या कार्यपद्धती बाबत ग्रामस्थांमधून प्रचंड नाराजीचे सूर निघत आहेत. बिबट्याकडून शेळ्या मारण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. आता तर बिबट्याचा गावाच्या आसपासच वावर वाढल्याने ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी वर्ग बिबट्याच्या दहशतीखाली वावरत आहे. वनविभागाकडे बिबट्याच्या बंदोबस्ताची वारंवार मागणी करूनही वनविभागाकडून शेतकऱ्यांच्या मागणीचा कसलाही विचार केला जात नसल्याने विभागातील शेतकरी वर्गातूनही वनविभागाच्या कारभाराबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
जाळगेवाडीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार
जाळगेवाडी (खालची) गावात प्रवेश करीत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गाभण शेळी जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी पहाटे साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. सुहास भिंताडे यांची गोठ्यात बांधलेल्या गाभण शेळीवर बिबट्याने हल्ला करीत तिला ठार मारले. गुरुवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास व्यायामासाठी घराबाहेर पडलेल्या युवतीवर ही या बिबट्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने ग्रामस्थांमधून भीती व्यक्त केली जात आहे. सदर युवतीने घरामध्ये पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला आहे.

आमच्या गावात वारंवार बिबटया येऊ लागला आहे. त्यामुळे सकाळी व्यायामासाठी जाण्याचेही धाडस होत नाही. गुरुवारी पहाटे नेहमीप्रमाणे व्यायामासाठी मी घराबाहेर आले असता रस्त्यावर अचानकपणे समोर बिबट्या दिसला. तो माझ्या दिशेने येताच मी भीतीने घराकडे पळ काढला. वनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त करावा.
—माधुरी जगदाळे, प्रत्यक्षदर्शी युवती



