माजगाव शाळेत शिक्षकांची वानवा
शंभर मुलांचा भार एका शिक्षिकेवर, मुलांचे दाखले काढण्यासाठी पालक आक्रमक
चाफळ/उमेश सुतार : माजगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील पाच पैकी चार शिक्षकांच्या बदल्या झाल्याने शंभर विद्यार्थ्यांचा भार एकाच शिक्षिकेला सांभाळावा लागत आहे त्यामुळे त्रस्त झालेल्या पालकांनी मुलांचे दाखले देण्याची मागणी केली आहे.
माजगाव तालुका पाटण येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये पहिली ते सातवी पर्यंतचे वर्ग आहेत. एकूण 94 विद्यार्थी संख्या असलेल्या या मोठ्या पटसंखेच्या शाळेत यापूर्वी पाच शिक्षक कार्यरत होते परंतु 17 ऑगस्ट रोजी पदवीधर शिक्षक बदली प्रक्रियेत या शाळेतील एका शिक्षकाची बदली झाली तर दिनांक 28 ऑगस्ट रोजी झालेल्या बदली प्रक्रियेत पुन्हा उपशिक्षकांच्या बदल्या झाल्याने या ठिकाणी केवळ एकच शिक्षिका आहे. त्यामुळे पहिली ते सातवीच्या वर्गाचा भार एकाच शिक्षिकेवर पडला आहे. या ठिकाणी नव्याने दोन शिक्षकांच्या तोंडी आदेशाने नेमणुका झाल्या आहेत मात्र या शिक्षकांना आदेश न दिल्याने ते अद्याप या शाळेवर हजर झालेले नाहीत. या गोंधळामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ लागले आहे यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी थेट शाळेत जाऊन पाल्याच्या दाखल्याची मागणी केली आहे.
सद्यस्थितीत केंद्रप्रमुखांनी माजगाव शाळेत गमे वाडी व नानेगाव शाळेतील शिक्षकांना तोंडी आदेशाने पाठवले आहे मात्र माजगाव शाळेसाठी कायमस्वरूपी शिक्षकांच्या त्वरित नेमणूक द्याव्यात अशी मागणी पालकांनी केली आहे दाखले मागणी करणारे विद्यार्थी पाचवी ते सातवीच्या वर्गातील असून त्यांनी मुले दुसऱ्या शाळेत दाखल केली तर या शाळेतील पाचवी ते सातवीचे वर्ग बंद पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे याचा गंभीर्याने विचार करून पाटणच्या कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी दीपा बोरकर यांनी योग्य ती कारवाई करावी अशी अपेक्षा पालक वर्गातून व्यक्त केली जात आहे.



