दामले प्रशालेत शिक्षक दिनाच्या निमित्त “विद्यार्थी शिक्षक दिन” उत्साहात साजरा
लोकसत्य न्यूज

पुणे/गुलटेकडी (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेचे मार्गदर्शक मा. मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या मार्गदर्शनाने ५ सप्टेंबर भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थी शिक्षक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थी शिक्षकांनी प्रशालेतील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांना अध्यापन व मार्गदर्शन करण्याचा अनुभव घेत आनंद लुटला.
विद्यार्थी शिक्षक दिनाच्या निमित्ताने उत्साहपूर्ण वातावरणात विद्यार्थी मुख्याध्यापक चि. प्रतीक घरजाळे व प्रशालेच्या विद्यार्थी पर्यवेक्षिका कु. श्रेष्ठी कसबे यांच्या सूचनेनुसार सकाळी सात वाजता शाळेची घंटा खणानली अन विद्यार्थी शिक्षक दिनाच्या दैनंदिन कामकाजाला शैक्षणिक वातावरणात प्रशालेत तासिकेनुसार सुरुवात झाली. विद्यार्थी शिक्षक तासिका नियोजनानुसार वर्ग अध्यापनात रममाण होऊन विद्यार्थ्यांना शिकवत होते. सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी नियोजनानुसार जबाबदारीने कामकाज करत आनंद व अनुभवाची शिदोरी भरत होते.
यावेळी प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या संकल्पनेतून ‘विद्यार्थी शिक्षक दिनाच्या समारोप ‘समारंभप्रसंगी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. अनिल तंवर सर, दहावीचे वर्गशिक्षक श्री. आश्रू बनकर सर, प्रताप सर्जेराव, इंद्रजीत मेमाने सर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी यांच्या उपस्थितीत प्रतिमापूजन झाले. यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. अनिल तंवर सर यांनी प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांच्या गुणांचे कौतुक करत मनोगत व्यक्त केले.
यावेळी रोहिणी मोहिते,वैष्णवी कडबगाव, जैनब पठाण, मल्हार कांबळे अंकिता,बेन्नीसुर या विद्यार्थी शिक्षकांनी आपले अनुभव विद्यार्थ्यांशी आदान-प्रदान करत सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक वैशाली साबळे मॅडम, मेधा हिंगे मॅडम व आश्रू बनकर सर यांनी विद्यार्थी शिक्षकांचे कौतुक करत भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे विचार व महती विद्यार्थ्यांना पटवून दिली. याप्रसंगी शिक्षक दिनानिमित्त प्रशालेतील विद्यार्थ्यांकडून उपस्थित गुरुजन शिक्षकांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी शिक्षिका सायली खंकाळ व श्रेया महिंद्रकर यांनी केले. विद्यार्थी शिक्षक दिनाचा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांचे, सेवकांचे व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.




