दामले प्रशालेत श्री गणेश आगमन…प्रतिष्ठापना…आणि विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न
महिला शिक्षिका व विद्यार्थी लेझीम पथकाचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे/गुलटेकडी (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेचे मार्गदर्शक मा. मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या संयोजनातून ढोल-ताशा, शिक्षक लेझीम पथकाच्या जल्लोषात वाजत-गाजत व ढोल-ताशाचा ठेका धरत उत्साहपूर्ण वातावरणात श्री गणेशाचे आगमन दामले प्रशालेत झाले.
यावेळी प्रशालेच्या ज्येष्ठ कलाशिक्षिका सौ. मेधा हिंगे मॅडम व विद्यार्थी यांच्या कल्पकतेतून श्री गणेशाची आरासातून आकर्षक सजावट करण्यात आली. यावेळी श्री गणेश आगमनासाठी सौ. वैशाली खोडवे मॅडम यांच्या सुबक रंगसंगतीच्या रंगावलीबरोबरच सौ. ज्ञानदा वाकलकर मॅडम यांच्या पौरोहित्याने श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापना प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या शुभहस्ते करण्यात आली.
यावेळी प्रशालेचे पर्यवेक्षक श्री. अनिल तंवर सर, शिक्षक व शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेश उत्सवानिमित्त ३०० विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून पर्यावरण पूरक आकर्षक व सुबक गणेश मूर्ती निर्माण करून प्रशालेचा उच्चांक साधला. श्री गणेशोत्सवानिमित्त प्रशालेमध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविण्यात आले.
उपक्रमामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेमध्ये श्री गणेशाची विविध रूपे रेखाटून आकर्षक रंगभरणी करत श्री गणेश भक्तीचे प्रतीक सादर केले. सर्व विद्यार्थ्यांनी ‘श्री गणेश’ संकल्पनेवर आधारित नाट्यछटा, पथनाट्य, गाणी, कला व नृत्याचे सादरीकरण करत विविध कलागुण दर्शन कार्यक्रमांमध्ये आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
विविध कलागुण दर्शनासाठी विद्यार्थी प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. सात दिवसाच्या श्री गणेश भक्तीत चि. ओम गंगदे व प्रशालेच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत दैनंदिन आरती सोहळ्यात पंचारती, अथर्वशीर्ष, श्री गणेश वंदना, मंत्रपुष्पांजली व श्री गणेशस्तोत्र घेण्यात आली.
श्री गणेश विसर्जन मिरवणुकीच्या जल्लोषपूर्ण वातावरणात विद्यार्थी ढोल -ताशा पथक, विद्यार्थी लेझीम पथक, शिक्षक लेझीम पथकाने वाजत-गाजत- नाचत गणपती बाप्पा मोरया!, मंगलमूर्ती मोरया!! गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या!! या आनंदी, विनम्र व भक्तिमय जयघोषामध्ये श्री गणेशाचे विसर्जन प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक वसईकर सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
श्री गणेश उत्सव व प्रशालेचे विविध उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांचे, सेवकांचे व विद्यार्थ्यांचे विशेष सहकार्य लाभले.




