खडीचा मारुती परिसरात आढळला ‘बुल फ्राॅग’
तलावात साठलेल्या पाण्यात सुरू आहे पिवळ्या बेडकांचे डराव डराव, रोजच भरतेय बेडकांची शाळा

चाफळ (उमेश सुतार) : पहिल्या पावसास सुरुवात होताच आपल्या कानावर आवाज येतो तो डराव डराव’चा. संपूर्ण ऋतूत बेडकांचा हा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. बुल फ्रॉग अर्थातच पिवळ्या रंगाची बेडकं आपल्याला पाहायला मिळतात. अशीच काही बेडकं खडीच्या मारुती परिसरात आढळून आलेली आहेत. तेथे एका तलावात साठलेल्या पाण्याच्या डबक्यात या बेडकांची रोजच चक्क शाळा भरत आहे.
पिवळ्या रंगाच्या या बेडकाचे आकर्षण बालचमूसह मोठ्यांनाही लागले आहे. वर्षभरात कधीही न दिसणारी ही पिवळ्या रंगाची बेडकं पाऊस सुरू झाला की ही बेडकं नक्की येतात कुठून? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पावसाळ्याच्या पहिल्या आठवड्यातच बेडकांचा फौज फाटा पाहायला मिळतो.
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये ‘बुल फ्राॅग’ हा बेडूक पिवळ्या रंगाचा असतो. पिवळा बेडूक हा नर असतो तर राखाडी कलरची मादी असते. पिवळा बेडूक हा मादी पेक्षा आकाराने लहान असतो तर मादी आकाराने मोठी असते. मादीला आकर्षित करण्यासाठी तो मोठ्याने आवाज काढत असतो या 25 दिवसाच्या कालावधीमध्ये ही बेडकं अंडी घालतात. एक महिन्यानंतर पिवळ्या बेडकाचा कलर हा राखाडी कलर सारखा परत होतो.
बेडूक हा उभयचर प्राणी असून अन्नसाखळीतील महत्त्वाचा घटक समजला जातो. हा शीत रक्ताचा प्राणी असल्याने त्याच्या शरीराचे तापमान सभोवतालच्या तापमानानुसार बदलत असते.



