प्रवाशांच्या डोक्यावर झाडांची टांगती तलवार
माजगाव-चाफळ रस्त्यावरील प्रकार, पावसात झाडे कधीही कोसळण्याची शक्यता, बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

चाफळ (उमेश सुतार) : माजगाव चाफळ या रहदारीच्या मुख्य रस्त्यावर रस्त्याकडेला असलेली वठलेली, वाळलेली झाडे कधीही उनमळून पडण्याच्या बेतात आहेत, याकडे बांधकाम विभागाचे पूर्णपणे दुर्लक्ष झालेले आहे. झाड अंगावर पडून एखादा मोठा अनर्थ घडला तर याला जबाबदार कोण? असा संतप्त सवाल परिसरातील प्रवाशांमधून उपस्थित केला जात आहे.
माजगाव ते चाफळ या रहदारीच्या मुख्य रस्त्यावर अनेक छोटे-मोठे झाडे रस्त्याच्या बाजूला कललेल्या अवस्थेत आहेत. सध्या या विभागात पावसाने हाहाकार माजवलेला आहे. पावसाने या मार्गावरील धोकादायक झाडे पडून रस्त्यावर येण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांच्या अंगावर पावसात झाड पडण्याची दाट शक्यता नाकारता येणार नाही, यामुळे मोठा अनर्थ सुद्धा होण्याची भीती आहे. यदाकदाचित प्रतिकूल घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असेल? असा प्रश्न प्रवाशांमधून विचारला जात आहे. यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गावरील धोकादायक झाडे त्वरित काढून टाकावीत, अशी मागणी होत आहे.
सध्या अवकाळी पावसाचे अधून मधून थैमान सुरू आहे. अशातच वादळी वारे व वळीवाच्या पावसाने वाळलेल्या झाडांना सर्वतोपरी धोका आहे, अशी वठलेली झाडे काढण्याची आवश्यकता आहे. रस्ते दुरुस्तीसाठी शासन कोट्यवधी रुपयाचा निधी देत आहे, मात्र संबंधित ठेकेदारांना दिलेली कामे तो नीट करतोय का याची शहानिशा न करताच अधिकारी कार्यालयात बसूनच अशा कामांची बिले काढली जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला अपघाताचे प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे.
रस्ते दुरुस्ती वेळी नेमके धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे याकडे बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक लक्ष देऊन या मार्गातील धोकादायक झाडे काढून टाकावीत अन्यथा पावसाळ्यात एखादी जीवित हानी झाल्यास त्याला सर्वस्वी बांधकाम विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल, असाही इशारा विभागातील जनतेने दिला आहे. सध्या परिसरात वादळी वाऱ्यासह वळीवाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे वाऱ्याने एखादे झाड पडण्याचा धोका निर्माण झाल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे



