बाटेवाडी पाठवडे रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक टप्प
गैरसोय तातडीने दूर करावी : नागरिकांची मागणी

चाफळ/प्रतिनिधी : येथील विभागात सलग दोन दिवस पडत असलेल्या पावसामुळे डोंगराच्या कुशीत वसलेल्या बाटेवाडी पाठवडे दरम्यानच्या रस्त्यावर दरड कोसळल्याची घटना घडली. यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
बाटेवाडी पाठवडे या रस्त्याचे नव्यानेच काम पूर्ण झाले आहे. मात्र संबंधित ठेकेदाराने रस्त्याच्या दुतर्फा नाले न काढल्याने कोसळलेली दरड थेट रस्त्यावर येत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. ठेकेदराचे व अधिकाऱ्यांचे लागेबांधे असल्यामुळेच या रस्त्याच्या दोन्ही बाजूने नाले केले गेले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
चाफळ विभाग हा दुर्गम व डोंगराळ असा आहे या विभागात पावसाचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे डोंगर भागात दरडी कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असतात गेले दोन ते तीन दिवसापासून विभागात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी बाटेवाडी पासून जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानक दरड कोसळली, मोठा आवाज आल्याने स्थानिक नागरिकांमधून भितीचे वातावरण निर्माण झाले. काही वेळाने घटनास्थळाकडे नागरिकांनी जाऊन पाहिले असता रस्त्यावर मोठे दगड, गोटे, माती आल्याने वाहतूक टप्पे झाली होती. बाटेवाडी ते पाठवडे या मार्गावर साडेतीन किलोमीटर रस्त्याचे नव्यानेच काम पूर्ण झाले आहे.

मात्र संबंधित ठेकेदाराने या रस्त्याच्या दुतर्फा नाले काढणे क्रमप्राप्त असताना त्याने नाले न काढल्याने दगड कोसळून थेट रस्त्यावर येत आहे. या रस्त्याला दुतर्फा नाल्याची सोय असती तर कोसळलेली दरड त्यावर आली नसती, अशा घटना वारंवार घडत असतानाही बांधकाम विभागाचे अधिकारी संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत आहेत की काय असावा सवाल स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे. रस्त्यावर दरड कोसळल्याने शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांना आपला जीव धोक्यात घालून या मार्गावरून मार्गक्रमण करावे लागत आहे. दरड कोसळल्याची घटना घडूनही संबंधित अधिकारी व ठेकेदाराला पाठीशी घालण्याचा उद्योग काही पुढारी लोकांनी केल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.
दरड कोसळलेल्या मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वेळेत लक्ष घालून नागरिकांची होणारी गैरसोय तातडीने दूर करावी, अशी मागणी बाटेवारी व पाठवडे ग्रामस्थांनी केली आहे.



