
कात्रज /लोकसत्य न्यूज :
येथील आगम मंदिर पासून ते दुगड फार्मपर्यंतच्या रस्त्यावर पावसामुळे खड्ड्यात पाणी साचल्याने शिवाय रस्त्यावर बारीक दगडी-मातकट मुरुम पसरवल्याने नागरिकांची चांगलीच गैरसोय निर्माण झाली आहे.
मातकट मुरूम रस्त्यावर टाकल्याने दुचाकी स्वार घसरून पडत आहेत. चार चाकी वाहन घसरत आहेत. याकडे गेली कित्येक दिवसांपासून महानगरपालिकेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
यावेळी कात्रज येथील रहिवासी राजू कदम म्हणाले कि, या रस्त्यावर पावसामुळे पाणी साचून चिखल झाल्याने शालेय विद्यार्थी आणि नागरिकांचीही गैरसोय होत आहे. तरी महापालिका प्रशासनाने लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी.
या रस्त्याचे डांबरीकरण सुरू आहे मात्र पावसामुळे हे काम थांबले आहे, पावसाची उघडीप मिळताच डांबरीकरण करण्यात येईल असे कुणाला यादव -धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे, पथ विभागाचे अधिकारी यांनी सांगितले आहे.

या परिसरात आगम मंदिर अटल वसाहतीतील एक ते दहा गल्ल्या सच्चाईमाता मंदिर, कदम बंगला, वाघजाईनगर, पंचमनगर आणि अंजनीनगर परिसरात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्याने या रस्त्यावर नागरिकांची वारंवार येत जा होत असते. या वस्त्यांमधील लोक याच रस्त्याचा जास्त वापर करत असतात. मात्र या रस्त्यावर सध्या पावसामुळे चिखल झाले असून पाणी जमत आहे, शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरीकांना या रस्त्यावरुन येता जाताना तारेवरची कसरत करावी लागते. महानगरपालिकेने या रस्त्याची दुरुस्ती करून रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.



