आळंदीतून पंढरीकडे धावता सफर
तब्बल 53 तासात लक्ष गाठले, कात्रज मधील पाच जणांचा धावता प्रयत्न यशस्वी

कात्रज/लोकसत्य न्यूज : अनेक जणांचा पायी वारी करण्याचा संकल्प असतो, वारीत दोन पावले तरी चालावीत असे लोक आवर्जून सांगतात मात्र कात्रज मधील सिद्धेश मेनकुदळे, ब्रह्मदेव सूर्यवंशी, प्रीती मस्के, रामचंद्र जाधव आणि दुर्गेश बुगडे यांनी धावत वारी पूर्ण केली आहे.
तीन दिवसात 53 तास 7 मिनिटे 14 सेकंदात त्यांनी हा पल्ला पूर्ण केला. वारीसोबत व्यायामाचे महत्व अधोरेखित व्हावे आणि पर्यावरणपूरक वारी संपन्न व्हावी या उद्देशाने त्यांनी ही रणवारी केली आहे.
संपूर्ण प्रवासात डी हायड्रेशन, न्यूट्रिशन, जेवणाची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था मनोहर टेमघरे आणि क्षितिज मस्के यांनी पाहिली. राजगड ते आग्रा पायी प्रवास करणारे आणि सिंहगड परिवार यांचे वारीसाठी मार्गदर्शन लाभले.
पहिल्या दिवशी संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन आळंदीतून हडपसर मंतरवाडी पर्यंत धावत 59 किलोमीटरचा टप्पा 12 तासात पूर्ण, दुसऱ्या दिवशी दिवे घाटातून चालत जात सासवड जेजुरी लोणंद फलटण मार्गे धावत पूर्ण 17 तास तीस मिनिटात 71 किलोमीटरचा पल्ला पूर्ण, तिसऱ्या दिवशी नातेपुते वाकरी मार्गे पुढे जात विविध टप्प्यात धावत 19 तास 30 मिनिटात 109 किलोमीटरचा प्रवास करत पंढरपूर गाठले. एकूण 240 किलोमीटरचा पालखी प्रवास तीन दिवसात पूर्ण केला. पंढरपुरात गेल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा घालून शेवटी नामदेव पायरी गाठली आणि रणवारी पूर्ण केली.
सिद्धेश मेधनकुळे, ट्रेकर यांनी सांगितले की, आम्ही अंतर साधारणता 20 ते 30 किलोमीटरच्या टप्प्याटप्प्याने पूर्ण केले. परंतु अशी वारी करण्याचा हा आमचा पहिलाच अनुभव होता, असे असले तरी आम्ही सातत्याने ट्रेक करत असतो. किल्ले फिरत असतो, त्याचबरोबर पांडुरंगाचे दर्शन घेण्याच्या इच्छाशक्तीपुढे कुठलाही थकवा जानवला नाही. ही वारी पूर्ण केल्याचा एक वेगळाच आनंद आहे.



