चाफळ /उमेश सुतार : चाफळ विभागातील कवठेकरवाडी येथे बिबट्याचा वावर वाढला आहे. बिबट्याने कारवानी जातीच्या कुत्र्याचा फडशा पाडल्याची घटना नुकतीच घडली. या प्रकारामुळे ग्रामस्थांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रात्री नऊच्या सुमारास बिबट्या गावाच्या परिसरात फिरत असताना विजय कवठेकर या युवकाला दिसून आला. यावेळी युवकाने गावातील काही लोकांना याची कल्पना दिली. तरुणांनी एकत्र येऊन बिबट्याला हुसकावून लावला मात्र ग्रामस्थांना भीतीच्या छायेखाली रात्र काढावी लागली. चाफळ विभागात अनेक दिवसापासून बिबट्याची दहशत कायम आहे.
शिवारात काम करताना शेतकऱ्यांना वारंवार बिबट्याचे दर्शन होत असते. भक्षाच्या शोधात बिबट्या गावागावात पोहोचला आहे. त्यामुळे घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. कवठेकरवाडी गोळेवस्ती येथील अमोल भाडगुळे यांचा कारवानी जातीचा कुत्रा बिबट्याने उचलून नेत मळा नावाचे शेतात असलेल्या आंब्याच्या झाडावर ठेवून त्याचा फरशा पाडला. दुसऱ्या दिवशी सकाळी कुत्र्याचा शोध घेतला असता, आंब्याच्या झाडावर बिबट्याने अर्धवट खालेल्या कुत्र्याचे अवशेष ग्रामस्थांच्या निदर्शनास आले तर सूर्याचीवाडी येथील प्रतीक मोरे यांचे पाळीव कुत्रे बिबट्याने पळवण्याची घटना घडली.
याबाबतची माहिती वनविभागाला देताच वनविभागाचे वनरक्षक रवींद्र कदम व कर्मचाऱ्यांनी परिसरात ग्रस्त घालत पाहणी केली असता, शिवारात ठीक ठिकाणी बिबट्याच्या पायाच्या ठसे आढळून आले. दरम्यान ग्रामस्थांनी रात्रीच्या वेळी घराबाहेर पडने टाळावे. शिवारात जाताना शेतकऱ्यांनी गटागटाने राहावे, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.



