फिरोज शेख सर यांनी आपल्या वडीलांबाबत लिहिलेला लेख

5 जून 1936- आज माझ्या अब्बांचा वाढदिवस. 84 वर्षे वय पूर्ण करून ते आज 85 व्या वर्षांत पदार्पण करत आहेत. त्यानिमित्ताने त्यांच्या आयुष्यातील असामान्य प्रसंग व त्यांच्याकडून घेण्यासारख्या प्रेरणादायक गोष्टी मी इथे मांडत आहे.
अब्बांनी 1956 ते 1996 या काळात 40 वर्षे महाराष्ट्रातील विविध साखर कारखान्यांत नोकरी केली व हेड क्लार्क पासून सुरुवात करून यशस्वी स्टोअर ऑफिसर म्हणून निवृत्त झाले. आयुष्याच्या या संपूर्ण प्रवासांत नोकरीबरोबरच शेती, मुलांचे शिक्षण यावर भर देणे, राजकारण यांतून समाजसेवा, आपल्या बोलक्या स्वभावाने लोकांशी जवळीक व मैत्रीपूर्ण संबंध बनवणे, प्रथमदर्शी बोलण्यातील रागीट, कडक स्वभाव वाटणारे पण प्रत्यक्षात मनाने अत्यंत मऊ व प्रेमळ स्वभावाचे एक अद्वितीय व्यक्तिमत्व जपणारे माझे अब्बा माझ्या आयुष्यातील अशी अनमोल व्यक्ती आहे कि जे वडील या नात्याबरोबर माझे मार्गदर्शक, आदर्श व एक चांगले मित्र आहेत.
शिक्षणाची प्रचंड आवड व आमच्यासाठी केलेले यशस्वी प्रयत्न
आमचे मूळ गाव सोनवडी बुद्रुक ( ता फलटण, जि. सातारा). शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या माझ्या अब्बांनी 1956 साली मुधोजी हायस्कूल मधून अकरावी (जुनी मॅट्रिक) पास केली व आजोबांनी त्यांना श्रीराम साखर कारखान्यांत नोकरी मिळवून दिली. त्या काळात मॅट्रिक पास होणे म्हणजे फार मोठे यश. अब्बा घरात थोरला मुलगा असल्याने घर प्रपंच सांभाळत सर्व मुलांचे शिक्षण पूर्ण करणे हे फार मोठे आव्हान होते. त्यासाठी येणाऱ्या अडचणींना सामोरे जात अब्बानी आम्हा सहा भावंडांना शिक्षणाचे महत्त्व पटवून तर दिलेच पण प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण पूर्ण करण्याचा एक महत्त्वाचा घटक आमच्या मनावर बिंबवण्यात अब्बा यशस्वी झाले. आम्हा सहा भावंडांत बहुतेक भावंडे आपले शिक्षण पूर्ण करून यशस्वी झाले, त्याचे पूर्ण श्रेय अब्बांना जाते. मला लहानपणापासूनच अभ्यासाची आवड होती ती अब्बामुळे. शाळेत मेरिटने पास होऊन शासकीय इंजिनिअरिंग (पॉलिटेक्निक) कॉलेज मधून मेकॅनिकल इंजिनीयर होणे हे अब्बांचे स्वप्न मी पूर्ण केले. पुढे एमबीए व आयएसओ ऑडिटरची परीक्षा पास करून मी परदेशात फॅक्टरी मॅनेजर या पदांवर काम केले. इतर भावंडेही त्यांचे शिक्षण पूर्ण करून वरिष्ठ पदावर नोकरी, व्यवसाय करत आहेत. ज्या काळात लोकांना शिक्षणाचे महत्त्व माहीत नव्हते त्या काळात मुलांना(व खास करून मुलींना) शिक्षण देताना लोकांच्या किती टीकेला सामोरे जावे लागले असेल याची आपण कल्पना करू शकता. पण अब्बा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत आपले ध्येय गाठत राहिले.
बोलक्या स्वभावाने लोकांना आपलेसे करणे व महाराष्ट्राची संस्कृती जपणे
आपल्या महाराष्ट्राची संस्कृती जपणे व मराठी भाषेवर प्रभुत्व या आमच्या खानदानी परंपरा अब्बानी आमच्यात रुजवली. यात अब्बाचा एक विशेष स्वभाव मी घेतला आहे व तो फार उपयुक्त आहे. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत फिरल्याने अब्बाना कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपलेसे करणे फार सहज जमते. ‘तुमचे गाव कोणते’ हा प्रश्न कोणालाही विचारायचा. मग त्याच्या शहर, गावातील व्यक्ती किंवा तेथील काही पाहिलेली ठिकाणे सांगायची. समोरचा व्यक्ती कमी वेळेत मित्र बनतो. प्रसंगानुसार मराठी म्हण व्यक्त करायची अब्बाची शैली आम्हा भावंडात पण आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आम्हा सर्वांचे आदर्श लहानपणापासून आहेत.
प्रत्येक प्रतिकूल परिस्थितीला हाताळण्याची क्षमता
कितीही मोठे संकट येवो, आपण घाबरायचे नाही, आत्मविश्वास कमी होऊ द्यायचा नाही आणि संकटातून मार्ग काढायचा, हे अब्बानी स्वतः करून आम्हाला शिकवले. कोणत्याही प्रकारचे नुकसान झाले तरी आपण ते विसरून वाटचाल करत राहायचे ही त्यांची खासियत.
राजकारण व लोकांची सेवा
अब्बा फलटणला शेती, नोकरी करत असताना ग्रामपंचायतला निवडून येत होते व ग्रामपंचायत, सोसायटीच्या माध्यमातून लोकांची अनेक कामे करीत असत. सातारा जिल्ह्याचे थोर नेते कै. शिवाजीराजे ना. निंबाळकर, कै. दादाराजे खर्डेकर यांच्याबरोबर अब्बांची राजकारणातून मैत्री झाली व पुढे तालुका स्तरावर वर्ष 1956 ते 1978 पर्यंत समाजसेवा करत राहिले. कै. यशवंतराव चव्हाणसाहेब व शरद पवारसाहेब यांच्याबरोबर काम करण्याचे भाग्य अब्बांना लाभले. पवार साहेबांना अधूनमधून भेटायला अब्बा जात असत व साहेब ही त्यांना नावाने ओळखतात. हाच वारसा कायम ठेवून मी शाळा, कॉलेजमध्ये निवडणूक क्षेत्रात अग्रेसर असायचो.
निवृत्तीनंतर इस्लामचा सखोल अभ्यास, हज व उमरा यात्रा
खेड्यात व पुढे साखर कारखाना कॉलनीत राहिल्याने आमचे कुटुंब मस्जिद, मोहल्ला पासून दूर होते. त्यामुळे इस्लामच्या मूळ ज्ञान व आचरणपासून फार कमी संपर्क होता. पण मनाने अल्लाह (परमेश्वर) ला मानणे, गरजू लोकांची मदत करणे व कोणाचेही वाईट करू नये ही सत्कार्य करत असल्याने अल्लाहने आमच्या कुटुंबाला इस्लामच्या आचरण व कृतीत आणले ही आमची श्रद्धा व विश्वास आहे. निवृत्त झाल्यानंतर अब्बानी तब्लिग जमात मध्ये सहभागी होऊन नियमित नमाज सुरू केली, इस्लाम व कुराणचे ज्ञान प्राप्त केले. अम्मी अब्बा दोघांची हज यात्रा झाली. मी सहकुटुंब सऊदीत असताना दोघांना सोबत घेऊन मक्का मदिना असा कार प्रवास केला व उमराह सुद्धा केले. आज आई वडील दोघांबरोबर राहून त्यांची सेवा करण्याचे पुण्य मला लाभले ही माझ्या आयुष्यातील सर्वांत मोठी कमाई आहे. दोघांनाही निरोगी दीर्घायुष्य लाभो व आम्हा सर्वांना ( मी, माझी पत्नी, माझी मुले, आम्ही भावंडे) त्यांची अशीच सेवा करत राहावो ही अल्लाह (परमेश्वर) कडे दुआ करतो.
फिरोज शेख
कात्रज, पुणे

