स्वाभिमानी व शेतकरी संघटना आणि आले उत्पादक शेतकऱ्यांच्या एकत्रित संघटितपणानंतर वाठारमध्ये आले उत्पादकांची परिषद झाली, त्यावेळी सरसकट सौदे करण्याचा निर्णय झाला. त्याप्रमाणे ठिकठिकाणी अंमलबजावणी सुरू झाली असल्याचे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
सुरुवातीच्या काळात व्यापारी नकार दिला असला तरी आता 70 टक्के सौदे हे सरसकट मिक्स होऊ लागले आहेत. बाजारपेठेमध्ये सुद्धा मिक्स मालाची मागणी वाढलेली आहे, त्यामुळे निश्चितच बाजारभावामध्ये सुद्धा वाढ होताना दिसत आहे. हीच परिस्थिती नजीकच्या काळामध्ये राहण्याची शक्यता आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची सगळी पथक आलं धुणाऱ्या ठिकाणी धाडी टाकत आहेत. दोन-तीन दिवसानंतर मोठे व्यापारी यांच्या वॉशिंग पॉइंटला स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि शेतकरी एकत्रित रित्या गाठीभेटी घेऊन सरसकट मिक्स सौदा या शेतकऱ्यांच्या भूमिकेमध्ये सहभागी होण्याची विनंती मोठ्या व्यापाऱ्यांना केली जाणार आहे. हा लढा शेतकऱ्याने हातात घेतलाय, त्याला शेतकरी संघटनेची ताकद मिळाली आहे मात्र अजून सुद्धा काही शेतकरी आडमुठे भूमिका घेऊन एखादा रुपया वाढता मिळतो आहे, या आशेने जुने नवे सौदे करत आहेत. धाड पडल्यानंतर आले जप्त करण्याची प्रक्रिया चालू होते. व्यापारी आपोआपच शेतकऱ्यांकडे बोट दाखवतो. त्यामुळे आमची शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही सरसकट मिक्स सौद्यासाठीच आग्रह करा.
व्यापारी शेतकऱ्यांनी पाठिंबा दिल्याशिवाय नवं जुनं करू शकते, त्यामुळे ही लढाई शेतकऱ्यांची आहे. आतापर्यंतच्या लढाईमध्ये आपल्याला चांगले यश आलेला आहे. स्वाभिमानीचे पदाधिकारी सुद्धा दिवस-रात्र मेहनत करून, घरचं खाऊन स्वतंत्र व खर्चाने फिरत आहेत. त्यामुळे त्यांच्या या लढाईला आपण सर्व शेतकऱ्यांनी पाठिंबा द्यायला हवा. एक दोन शेतकऱ्यांच्या मूर्खपणामुळे संपूर्ण लढा अपयशी ठरू नये एवढी जबाबदारी शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. प्रत्येक गावातील आले उत्पादकांनी एकमेकांना समजावून सांगून या चळवळीत सहभागी झाले पाहिजे अन्यथा पुढच्या वर्षी आले उत्पादकांच्या नरडीवर सुरा आल्याशिवाय राहणार नाही, असे शेतकरी संघटनेतर्फे सांगितले आहे.



