कात्रज वंडरसिटी समोरील पाऊलरस्ता नागरीकांसाठी बनला जीवघेणा
जनतेला संबंधितांकडून मदतीची अपेक्षा

कात्रज (प्रतिनिधी) : कात्रज वंडरसिटी समोरील रस्त्याचे खोदकाम सुरु असल्याने रस्ता ओलांडताना नागरीकांना जीवघेणी कसरत करावी लागते, यावर लवकरात लवकर पर्यायी मार्ग काढावा अन्यथा रास्तारोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.
जैन मंदिराकडील रस्त्याने खाली उतरल्यानंतर समोरून हायवेचा रस्ता ओलांडून वंडरसिटीकडे जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. ब्रीजचे काम सुरु असल्याने रस्त्यात खोदकाम केलेले आहे. नागरीकांना या मार्गावरुन ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागते.

समोरच असलेल्या मोरे बाग मध्ये खेळण्यासाठी चिमुकले येत असतात शिवाय म्हातारी माणसे बागेत विरंगुळ्यासाठी या जवळच्या रस्त्याने येत असतात परंतु रस्त्याचे काम चालू असल्याने आणि संबंधित ठेकेदाराने याठिकाणी रस्ता उकरुन ठेवल्याने जनतेला खूप त्रास सहन करावा लागत आहे.
कात्रज चौक म्हणजे “मौत का कुआ” असे जनतेकडून म्हटले जाते. त्यामुळे येथील लोक पर्यायी रस्ता निवडत असतात. परंतु पर्यायी रस्त्याला सुध्दा खोळंबा करुन ठेवल्याचे येथील जनतेतून बोलले जाते.

सध्या अवकाळी पावसाचे अधूनमधून थैमान चालू आहे. यदाकदाचित प्रतिकूल घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन जनतेला सहकार्य करावे अशी भावना समाजातून व्यक्त केली जाते.



