महाराष्ट्र

आजही वाटेवरती काचा गं !

लोकसत्य न्यूज

       बापलेकीचे नाते असतेच संवादी; तसे न बोलताही अंतर्बाह्य समजत जातात ते एकमेकांना लेकीला लग्नासाठी पाहिलं स्थळ सांगून आलं आणि तिचा प्रवास आता काहीसा वेगळा वाटेवरून होईल, ह्या घरासोबत असणारे तिचे बंध कदाचित काहीसे सैल होतील आणि जगरीत परंपरा यानुसार ती जाईल ‘तिच्या’ घरी. “माझ्या अंगणातलं माझं लाडकं रोपटं कुणीतरी काढून नेईल आणि ते आता दुसऱ्या अंगणात बहरेल, सुगंधेल, मोहरेल. कसं काय स्वीकारू शकतो एक बाप हे एवढ्या सहजी? कन्यादान म्हणून तिचं वस्तूकरण केलं गेलंय ते किती भयंकर आहे. दान करून हक्क सोडणे भीषणच आहे हे! आईची कथाही काही वेगळी नसते पण बापलेकीचं नातं असतं जगावेगळं…
तिचे लाडकोड पुरवतानाही बाप घेत नाही हात आखडता. तो बघतो तिच्या निरागस चेहऱ्यात आपली आई,बहिण, आजीचं रूप. तो जपतो तिला जीवापाड, जोजावतो तळहाताचा पाळणा करून! ती बाबा, दादा, अण्णा, अप्पा म्हणो वा पप्पा त्याचं काळीज अभिमानाने फुगतं लेकीची ती प्रेमळ मधाळ साद ऐकताना. ती येते धावत दुडूदुड त्याच्याकडे दुडक्या चालीत अन घालते गळामिठी चांदण्यांची त्याला आणि बोबड्या बोलात करते आईची तक्रार तेव्हा तो असतो तिचं हक्काचं ठिकाण. तिचं यश असो वा अपयश ते सांगताना तिला आईपेक्षा बाप नेहमीच जवळचा वाटतो असं असतं बापलेकीचं नातं आगळंवेगळं! तिचा अभ्यास, तिच्या परीक्षा, तिचे निकाल, तिचे प्रवेश, तिची यशस्वीता, तिची नोकरी, तिचा नोकरीतील पहिला दिवस, तिच्या नोकरीतला पहिला पगार, तिचं असं भक्कमपणे स्वावलंबी होणं असते इतिकर्तव्यता त्याच्या आयुष्याची.

मुलगी असते घराची बरकत, मुलगी असते घरातला अवीट चिवचिवाट, मुलगी असते घराची प्रसन्नता, जणू पहाटेचा प्रसन्न तजेला, मुलगी असते घराचा जिवंतपणा. मुलीने बापाची लाडिक थट्टा केली तरी बाप करतो सहन अन हसतो खळखळून न चिडता, तो देतो तिच्या कर्तुत्वाला, कौशल्याला, दिसण्याला अन असण्यालाही दाद! तिचं हसणं म्हणजे त्याचं चांदण्यात भिजणं. बाप असला जरी कितीही व्यग्र त्याच्या व्यापात तरी त्याचे चित्त असतेच त्याच्या लाडक्या परीकडे. तो बघत असतो तिचं वाढणं, घडणं, शिकणं आणि आत्मनिर्भर होणंदेखील! पूर्वी बापाला ‘पोर म्हणजे घोर’ वाटायची अन तो तिला द्यायचा उजवून लवकरच. तेव्हा तीही नव्हती सजग स्वतःच्या अस्तित्व अन स्वप्नांबद्दल. लग्न करून गेली म्हणजे कितीतरी संकटं, हालअपेष्टा पचवत आयुष्याची फरफट झाली तरी ती कायमची कधी परतून येत नव्हती माहेरा!
मग कधी स्टोव्हचा भडका व्हायचा, कधी पाणी शेंदताना विहिरीत पाय घसरून पडायची तर कधी चिमणीवर तिचा पदर पडून पेट घ्यायचा. कधी तिला अन्नातून विषबाधा व्हायची वा कपडे धुवायला नदीवर गेली कि पाय घसरून पडायची, बुडायची खोल आणि मग तिचं अचेतन कलेवर जेव्हा बाहेर काढलं जायचं तेव्हा कधीकाळी हसत्याखेळत्या असणाऱ्या आपल्या लेकीचा निश्चल देह बघून मायबापाच्या काळजात व्हायची प्रचंड कालवाकालव , काळजाचा लचका असा डोळ्यादेखत तोडला खुडला जातो तेव्हा त्याची आर्त वेदना मायबापालाच तर समजणार. ते करायचे आकांत पण पुरुषीव्यवस्थेने बाई जिती असताना काय कि मेल्यावर काय तिच्यावर अन्यायच केलाय अन आजवरचा इतिहास त्याला साक्ष आहेच कि! मग पोलिसात शिताफीने सर्रास अपघाताची नोंद व्हायची. बापाच्या डोळ्यातल्या पाण्याला नसायचा खंड कैक दिवस. भाकरीचा घास घशाखाली न उतरणं काय असतं? ते शब्दश: भोगायचे ते. एक प्रश्न निरुत्तरच असायचा, “हे सारे अपघात कधी सुनेव्यतिरिक्त दुसऱ्या कुणाबरोबर कधीच का बरं घडले नसावेत?”
मग काळ कूस बदलू लागला. लेकीबाळी शिकू लागल्या, मुलग्यांपेक्षा सरस ठरू लागल्या. बोर्डात-विद्यापीठात चमकू लागल्या. घरदार सांभाळून नोकरी करू लागल्या. जोडीदार ठरवताना आता त्यांच्याही अटी,अपेक्षा असतात. त्या पडतात प्रेमात, निवडतात जोडीदार कधी सहमतीने तर कधी विरोधात जाऊन करतात लग्न, थाटतात संसार. त्याच्या प्रेम अन विश्वासाखातर घरदार सोडून आलेल्या, तिच्यासाठी माहेरचे दरवाजे कायमचे बंद झालेल्या मुलीचा छळ करून तिचा जीव घेणारा पतीही ह्या काळात दिसतो आहे.

       अगदी चहापोहे कार्यक्रम होऊन ठरवून झालेल्या लग्नाचेही भीषण चित्र आज दिसते. आर्थिक हव्यास, अविचार, संवेदनाशून्यता, लोभ, अमानवी अपेक्षा ह्यामुळे एकंदर आजही लेकींच्या ‘वाटेवरती काचा’ आहेतच. आज लाडकोडापेक्षा मुलींना शिकवून निर्णयक्षम, व्यवहारी अन खंबीर बनवणे हे पालकांचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. नाजूक सुंदर दिसण्यापेक्षा तिच्या कर्तृत्वात तिचे खरे सौंदर्य असते त्यामुळे आपकमाईसाठी खस्ता खाऊ द्याव्यात मुलीलाही म्हणजे तिला बापकमाईचे मोलही कळेल. अर्थात हे मुलांसाठीही लागू होते. सोबती निवडताना आंधळेपणाने भाळून प्रेमात पडण्यापेक्षा प्रामाणिक प्रेमविश्वासाने कोणत्याही परिस्थितीत सोबत ठाम उभा राहणाऱ्या व्यक्तीची निवड जगण्यातील स्थैर्यासाठी महत्वाची असते हेही व्यवहारज्ञान तिला येणे गरजेचे आहे. असे झाले तर तान्ह्या लेकराला मागे ठेवून, मायबापाला असह्य दु:ख देऊन यानंतर कुणी वैष्णवी फाशीचा दोर जवळ करत प्रवास संपवणार नाही.
डॉ. प्रतिभा जाधव, नाशिक
(लेखिका साहित्यिक, वक्ता व एकपात्री कलाकार.)

Share

Chief Editor - Raphik Shaikh

"लोकसत्य न्यूज" हे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही या माध्यमातून आपल्याकडे पोहोचत आहोत. प्रत्येक बातमीशी मुख्य संपादक सहमत असतीलच असे नाही तर संबंधीत बातमीला जे ते प्रतिनिधी जबाबदार असतील. आपण आपल्या बातम्या WhatsApp, Email द्वारा आम्हाला पोहचवू शकता. raphik.261175@gmail.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!