नवनीत प्रकाशनाच्या चित्रकला स्पर्धेत दामले प्रशालेच्या विद्यार्थ्यांची भरारी
पुणे आयोजित चित्रकला स्पर्धेतील विद्यार्थीनींचे यश

पुणे-गुलटेकडी/प्रतिनिधी – येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेचे मार्गदर्शक मा. मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या संयोजनातून व कलाशिक्षिका सौ. मेधा हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली नवनीत प्रकाशन, पुणे आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग नोंदवून बक्षिसांची लयलुट केली.
दामले प्रशालेतील इयत्ता पाचवी ते आठवीच्या २०० विद्यार्थ्यांनी नवनीत प्रकाशनातर्फे आयोजित चित्रकला स्पर्धेमध्ये लहान व मोठ्या गटात सहभाग नोंदविला. या चित्रकला स्पर्धेमध्ये दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी सुयोग्य रेखाटन, आकर्षक रंगसंगतीच्या आधारे वास्तव रंगभरण करून उस्फुर्तपणे विद्यार्थ्यांनी आपला ठसा उमटविला. या चित्रकला स्पर्धेत नेहमीप्रमाणे यशस्वी भरारी घेत प्रशालेचे विद्यार्थी बक्षिसाचे मानकरी ठरले.
या वर्षीच्या चित्रकला स्पर्धेमध्ये लहान गटामधून चि. शौर्य शेलार, (५ वी, अ) चि. गणेश मुंडे व सक्षम साठे (६ वी, अ) यांनी तर मोठया गटातून चि. गणेश क्षीरसागर (७ वी, अ) चि. जैन शेख (८वी, ब) कु. मानवी शिंदे व कु. यज्ञा केंगले (८वी,अ) हे प्रशालेची विद्यार्थी बक्षीसाचे मानकरी ठरले.
या चित्रकला स्पर्धेसाठी प्रशालेचे सन्माननीय मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर, पर्यवेक्षक श्री.अनिल तंवर सर व कलाशिक्षिका सौ. मेधा हिंगे मॅडम यांनी बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे कौतुक करत पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.




