
कात्रज/लोकसत्य न्यूज : कात्रज चौक म्हणजे मृत्यूचे आणि अपघाताचे माहेरघर आहे, असे नागरिकांतून म्हटले जात आहे. कात्रज चौकात सतत अपघात होत असतात. मागील आठवड्यात कात्रज चौकात दोघांचा बळी गेला, अशा प्रकारच्या वारंवारच्या जीवघेण्या अपघाताला जबाबदार कोण? असा प्रश्न येथील स्थानिक जनतेतून केला जात आहे.
मागील आठवड्यात दोन अपघात कात्रज चौकात झाल्यामुळे दोन घरे उध्वस्त झाली आहेत, घरचा कमावता माणूस हरपल्याने दोन्ही घरावर डोंगर कोसळलेले आहेत, याचे कारण म्हणजे कात्रज चौकातील वाहनांची वर्दळ, तरी संबंधितांनी याकडे लक्ष देऊन उध्वस्त होणाऱ्या घरांना वाचवण्यासाठी कात्रज नागरिकांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा स्थानिक नागरिकांत केली जात आहे.
कात्रज येथील स्थानिकांना रहदारीचा खूप त्रास होत आहे, रस्ता ओलांडताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रिक्षा तुफान वेगाने पळत असतात, पीएमपी बसवाल्यांचा सुद्धा ताफा भरवेगाने या चौकामधून पळत असतो. शिवाय मोटार सायकल स्वार सुद्धा सिग्नल सुटताच अति वेगाने पळत असतात. ट्राफिक काढण्यासाठी पोलीस प्रशासन अतोनात कष्ट घेत आहे. परंतु वाहनांच्या वर्दळीमुळे होणाऱ्या या अपघातांना कुठेतरी संबंधितांनी आळा घालण्याचे काम केले पाहिजे. त्यासाठी यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची गरज आहे.
त्यामुळे कात्रज पीएमपी डेपो हलवावा अशी मागणी शिवशंभु प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेश कदम यांनी पीएमपीचे व्यवस्थापक सतीश गव्हाणे यांच्याकडे केली आहे. कात्रजचा बस स्टॉप स्थलांतर करून पद्मावती, बालाजीनगर यासारखा रनिंग बस स्टॉप आम्हाला द्या. कात्रजकरांवर लादलेला हा बस डेपो हटवा. कात्रज घाटाच्या आसपास कुठेतरी जागा घेऊन पीएमपीचा बस डेपो बनवा. कात्रजकरांना मोकळा श्वास येऊ द्या, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे.
पीएमपी प्रशासनाने कात्रज बस स्टॉप हलवण्यासाठी योग्य ती कारवाई करावी, अन्यथा शिवशंभु प्रतिष्ठानचे वतीने आंदोलन केले जाईल, असे कदम यांनी या पत्राद्वारे सांगितले आहे.



