
बाबासाहेबांनी केवळ इतिहास घडवला नाही, तर हजारो वर्षांचा अन्याय, अज्ञान आणि अस्पृश्यतेच्या अनेक पिढ्यांना आपल्या ज्ञानप्रकाशाने अंधारातून बाहेर काढले. भारताच्या संविधानाचे शिल्पकार, समाजसुधारक, अर्थतज्ज्ञ, कायदेतज्ज्ञ, लेखक, तत्वज्ञ आणि दलित, वंचित, शोषितांच्या हक्कांचा बुलंद आवाज असलेल्या बाबासाहेबांनी दिलेल्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या त्रिसूत्रीचा आजही प्रत्येक पिढीवर प्रभाव आहे.
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हेच आपल्या प्रगतीचे खरे शस्त्र आहेत. आज बाबासाहेबांची जयंती साजरी करताना आपल्याला त्यांच्या विचारांची आठवण ठेवून ते विचार कृतीत आणण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेब हे केवळ एका वर्गाचे नाहीत, ते संपूर्ण मानवतेचे प्रेरणास्थान आहेत. बाबासाहेबांनी संपूर्ण मानव समाजासाठी, सर्व भारतीयांसाठी मूलभूत आणि महत्वपूर्ण काम केलेले आहे.
बाबासाहेबांची 134 वी जयंती साजरी करत असताना आपण सर्वजण एकजूट होऊन समतेच्या, न्यायाच्या आणि शिक्षणाच्या दिशेने बाबासाहेबांच्या स्वप्नांची पूर्तता करूया. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि राजकीय अस्तित्वासाठी बाबासाहेबांचा विचार घेऊन पुढे जाऊया…जिथे समता आहे, तिथेच खरे स्वातंत्र्य आहे. त्यामुळे बाबासाहेबांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेले मूलभूत हक्क आणि अधिकार जपूया, जागरूकपणे आपल्या कर्तव्याची आणि जबाबदारीची जाणीव ठेवूया…!
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम …..



