
पाल/लोकसत्य न्यूज :
पाल, ता कराड येथे दि. ११ जानेवारीला श्री खंडोबा देवाची यात्रा भरणार आहे. या यात्रेसाठी राज्यातून व शेजारील राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. पाल गावात आणि परिसरातील गावात मोठ्या प्रमाणात वाहतूकीची कोंडी होत असते. यामुळे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३(१) (ब) नुसार पाल परिसरातील वाहतूकीच्या मार्गात दि. 9 जानेवारी मध्यरात्रीपासून दि. १६ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत वाहतूकीतील बदलाचा पुढीलप्रमाणे आदेश जारी केला आहे.
पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे की, काशिळ ते पाल रोडने येणारी सर्व वाहने पाल गावाच्या कमानी जवळ तात्पुरते एस टी स्टॅन्ड समोर थांबवावित. त्याच्यासमोरील शेतात केलेल्या पार्कींग व्यवस्थेनुसार तेथे वाहने पार्क करावीत. हरपळवाडी मार्गे पाल येथे येणारी सर्व वाहने ईमरसन कंपनीजवळ व तेथील शेतात वाहने पार्क करावीत. तारळेहून पालकडे येणारी सर्व वाहने ही तारळे रोडला असलेल्या पाल ग्रामपंचायतीचे नर्सरी समोर रोडवर थांबवावित. मरळी ते पालकडे येणारी सर्व वाहने ही खंडोबा कारखान्यासमोर असलेल्या श्रीकांत शेजवळ यांचे शेतासमोर थांबवावीत.
काशिळकडून तारळेकडे जाणारी सर्व वाहने निसराळे फाटा, इमरसन कंपनी, सासपडे मार्ग तारळेकडे जातील. तारळेकडून काशिळ अथवा कराडकडे जाणारी वाहतुक ही तारळे येथुन कोंजावडे फाटा, सासपडे मार्गे खोडद फाट्यावरुन कराडकडे जातील. कराड तसेच पाल भागातून तारळे भागात जाण्याकरीता खोडद येथील फाट्यावरुन इमरसन कंपनी शेजारुन सासपडेमार्गे तारळेकडे जातील. वडगांव ते पाल हा सगळा रस्ता आपतकालीन रस्ता असून त्या रस्त्यावर येणाऱ्या सर्व वाहनांना व वाहने पार्किंग करणेस बंदी आहे.
९ जानेवारीच्या रात्री २२.०० वाजलेपासून १६ जानेवारी रोजीच्या रात्री 10 वाजेपर्यंत वडगाव ते इंदोली फाटा जाणारे रस्त्याशेजारील जागेवर वाहनांना पाकींग करीता बंदी घालणेत येत आहे. 9 जानेवारी ते 16 जानेवारी पर्यंत पाल गावात येणा-या सर्व वाहनांना बंदी घालण्यात येत आहे. पाल गावात येणाऱ्या सर्व वाहनांना 10 जानेवारी रोजी दुपारी 3 पासून 12 जानेवारी सकाळी १० वाजेपर्यंत बंदी घालण्यात आलेली आहे. दि. 15 जानेवारी (पाकाळणी दिवशी) रोजीचे सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यत पाल गावात येणाऱ्या सर्व वाहनांना बंदी घालण्यात येत आहे.



