चाफळ खोऱ्यात बिबट्याची दहशत कायम…!
कुत्रे व शेळ्यांची संख्या घटली, बळीराजा चिंतेत

चाफळ (उमेश सुतार) : चाफळ खोऱ्यात बिबट्यांच्या संख्येत होणारी वाढ पाहता शासकीय गोटात समाधान व्यक्त होत आहे. मात्र वन्य प्राण्यांपासून होणाऱ्या शेळ्या व कुत्र्यांच्या शिकारीमुळे बळीराजा काळजीत पडला आहे.
एका आठवड्यात सरासरी चार-सहा जनावरांची शिकार होतच असते. अनेकदा रात्री अपरात्री दबा धरून बसलेल्या बिबट्याने शेळी पळवल्याचे सकाळीच समजते तर कधी कधी राखण्यासाठीचा कुत्रा ही फस्त झाल्याचे निदर्शनास येते. शेळी ही गरिबाची गाय आणि झटपट दाम दुप्पट उत्पन्न देणारी बँक आहे. तिच्याकडून मिळणाऱ्या उत्पन्नातून संसाराला हातभार लागत असतो. अशातच वन्य प्राण्यांचे विशेषता बिबट्याच्या हल्ल्यात पाळीव जनावर मारली जात असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट कोलमडते. त्यामुळे पुन्हा दुसरी शेळी विकत घेणे बळीराजाला शक्य होत नाही.
बऱ्याचदा शेतकऱ्यांच्या समक्ष बिबट्याने पाळीव जनावरावर हल्ला केल्याच्या घटना वारंवार घडत असतात अशावेळी शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महिला वर्गच नव्हे तर पुरुष मंडळी शिवारात एकटे जाताना घाबरत असतात. एकमेकांच्या सोबतीनेच रानातून जनावरे चालली जातात. शिंगणवाडी चाफळ येथे गोट्यात घुसून एका रात्री तीन शेळ्यांचा बिबट्याने जीव घेतला. बाहेर पडता आले नसल्याने रात्रभर तो आतच होता. सकाळी गोठा मालकाने दार उघडून आत जाताच समोरच बिबट्या दिसला दैव बलवत्तर असल्याने बिबट्याने झूम ठोकली.

चापळ परिसरात एकाच ठिकाणी बिबट्याने 30 40 कोंबड्यांचा जीव घेतला. तसेच कृष्णत साळुंखे यांच्या तीन शेळ्यांचा एकाच वेळी जीव घेतला. धायटीत महिलेच्या समक्ष शेळीवर हल्ला झाल्याने महिला घाबरल्या. अशा एक ना अनेक यापूर्वी घडलेल्या घटनांची पुन्हा पुन्हा पुनरावृत्ती होताना दिसत आहे. चाफळ विभागात बिबट्याची दहशत कायम असल्याने शेतकऱ्यांनी आता शेळीपालन करायचे की नाही अशी बिकट व्यवस्था निर्माण झाली आहे.
वन विभागाकडून वेळीच मृत जनावरांच्या भरपाईसाठीची प्रक्रिया होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागत असते तसेच स्थानिकांनी घ्यावयाच्या काळजीबाबत प्रबोधन करण्यात येत आहे. अशावेळी घाबरून न जाता सावध राहावे. मृत जनावरांची भरपाई प्रक्रिया त्वरित केली जाते. प्राण्यांचे प्रत्यक्ष फोटो काढण्यासाठीचा मोह टाळून एकमेकांना सहाय्य करावे असे राजेश नलावडे वनक्षेत्रपाल, पाटण यांनी सांगितले आहे.



