विज्ञान प्रदर्शनातून उज्वल पिढी उदयास येईल : प्राचार्य विजयकुमार काळबागे
'गुरुकुल' विद्यालयात विज्ञान प्रदर्शन

चाफळ : विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसंगी पत्रकार उमेश सुतार, प्राचार्य विजयकुमार काळबागे, शंभूराज पाटील व मान्यवर.
चाफळ,(उमेश सुतार) : गुरुकुल निवासी विद्यालयामधून मुलांवर योग्य संस्कार केले जात आहेत. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बौद्धिक कक्षा रुंदावण्यास वाव मिळत आहे. अशा विज्ञान प्रदर्शनामधून उज्वल भारत घडविणारी पिढी निर्माण होईल, असे प्रतिपादन प्राचार्य विजयकुमार काळबागे यांनी केले.
चाफळ, ता. पाटण येथे नॅशनल सायन्स गुरुकुल निवासी विद्यालयात भरवण्यात आलेल्या विज्ञान प्रदर्शनात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून मंथनचे केंद्रप्रमुख उमेश सुतार उपस्थित होते. यावेळी गुरुकुलचे संस्थापक शंभूराज पाटील, तांबवे सरपंच जयश्री कबाडे, मुख्याध्यापक सुनील पुजारी, शोभा शिंदे, रेश्मा वाढते, नीता पवार, पर्यवेक्षक राजेंद्र लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यानी या प्रदर्शनात सहभाग घेतल्याने या प्रदर्शनास चांगलाच प्रतिसाद मिळाला. ग्रामस्थ व पालकांनी या प्रदर्शनास उपस्थित राहून मुलांचे कौतुक केले. प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी टाकाऊ वस्तूंचा वापर करीत टिकाऊ स्वरूपाची उपकरणे प्रदर्शनात मांडली होती. यामध्ये पवन ऊर्जा प्रकल्प, पवनचक्की, फुफूस क्रिया, ट्विटर, हायड्रोलिक ट्रान्सफोर्ट क्रेन, न्यूटन्स डिस्क, चांद्रयान, इलेक्ट्रॉनिक स्मार्ट सिटी, स्टडी लॅम्प, एटीएम मशीन, रेन अलार्म, एअरगन, मंकीगन, स्वच्छ भारत, मंगळ यान, पिठाची गिरण, एअर प्रेशर, राज्य व राजधानी ओळख, पवनचक्की आणि पॉवर सप्लायर, ज्वालामुखी, सेन्सर, मुक्त गोठा यासह इतर उपकरणे तयार करून मुलांनी प्रदर्शनात मांडली होती.
विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी गुरुकुल व्यवस्थापक, विज्ञान विभाग प्रमुख, सर्व शिक्षक स्टाफ, कर्मचारी व विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.



