आला थंडीचा महिना… झटपट शेकोटी पेटवा…!
ग्रामीण भागात थंडीच्या प्रमाणात वाढ, उबदार कपडे खरेदीसाठी झुंबड
चाफळ : थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीभोवती रंगलेल्या गप्पा. (उमेश सुतार)
चाफळ/उमेश सुतार : थंडीचे प्रमाण वाढल्याने ग्रामीण भागातील लोक गारठु लागले आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी गावोगावी शेकोट्या पेटवण्याचे प्रमाणामध्ये वाढ झाली आहे.
‘आला थंडीचा महिना, झटपट शेकोटी पेटवा’ या गीताची आठवण करून देणारा ऋतु म्हणजे हिवाळा. सर्वसाधारण ऑक्टोबर महिन्याच्या मध्यावर सुरू होणाऱ्या थंडीस यंदा मात्र नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात सुरुवात झाली आहे. हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्यामुळे सायंकाळी 6 वाजल्यापासून थंडीस प्रारंभ होत आहे. सकाळी पडणारी बोचरी थंडी दिवसभर अंगातून जात नाही. हिवाळ्यातील बदलत्या वातावरणाने प्रात:काळच्या वातावरणात मात्र आल्हाददायक वाटत आहे.
यंदा सुरुवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने अतिपावसाचा फटका शेतकऱ्यांना चांगलाच बसला. उडीद, हायब्रीड, आरगड, सोयाबीन, भुईमूग, सर्व कडधान्ये तसेच अन्य पालेभाज्या यांच्या उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. मात्र हिवाळी पिकांना चांगले हवामान असल्याने रब्बीचे उत्पन्न चांगले मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा आहे.
पावसाचे कोंदटलेले स्वरूप विरून नव्या उत्साहाच्या जोमाने व दवबिंदूच्या दाट शिडकाव्याने शिवारातील पिके शीतल वाऱ्याच्या झुळकेने डुलत आहेत. हिवाळी रब्बी पिकांना जास्त पाण्याची आवश्यकता भासत नसल्याने शेतकरी आनंदित दिसत असून त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. सुरुवातीपासून थंडीचा कडाका जास्त प्रमाणात जाणवू लागला असून डिसेंबर महिन्यात काय अवस्था होईल, याची चिंता लोकांना लागली आहे.
हिवाळ्याच्या प्रारंभीपासूनच थंडीस उपयुक्त असणाऱ्या स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे, शाल अशा उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी लोक गर्दी करत आहेत. थंडीमुळे गारठलेली वयोवृद्ध मंडळी उबदार पांघरून घेऊन सर्वांग लपेटून थंडीला प्रतिकार करीत सकाळच्या उन्हाचा आसरा घेताना दिसत आहेत. तर काही मंडळी थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटी पेटवून थंडी घालविण्याचा प्रयत्न करीत आहेत. रात्रीच्या वेळी पेटणाऱ्या शेकोटीभोवती गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या गप्पांना रंगत येत आहे.
हिवाळी कपड्यांच्या खरेदीसाठी झुंबड
बोचऱ्या थंडीपासून बचाव करण्यासाठी लोकांना लोकरीच्या कपड्यांचा आश्रय घ्यावा लागत आहे. थंडीचा जोर वाढू लागल्याने उबदार कपडे खरेदी करण्यासाठी नागरिक दुकानात गर्दी करू लागले आहेत. त्यामुळे स्वेटर विक्रेत्यांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.




