ग्रामीण भागात कडकलक्ष्मीची आजही परंपरा कायम
चाफळमध्ये कडकलक्ष्मीचे दारोदारी दर्शन, दिपावली सणामुळे सर्वत्र उत्साह

चाफळ/उमेश सुतार : तीर्थक्षेत्र चाफळमध्ये दीपावली उत्सवा अगोदरच डेरे दाखल झालेल्या कडकलक्ष्मीच्या जोगव्यास प्रारंभ झाला असून कडकलक्ष्मीच्या बुगुबूगूच्या आवाजाने चाफळकरांची दिवसाची सुरुवात होत आहे.
“लेकीचा नवस घे की ग, लेकीच्या वट्या भराया, वर्षाती एकदाच येतेस आई… लेकरा बाळांना सुख देऊन जा आई” अशा बोधात्मक कवणातून प्रत्येकाच्या भावमय जीवनाचे सार्थक करण्याचे कार्य प्रतिवर्षी क कडकलक्ष्मी कळत नकळत करीत असते. सकाळी उठल्यानंतर लक्ष्मीचा देव्हारा डोक्यावर घ्यायचा आणि वाटेला लागायचे. दिवसभर गल्लीबोळात फिरत बुगुबूगुबूगू करीतच जोगवा गायचा. असा यांचा दिनक्रम चालतो.
बैलाची गाडी दारापुढे उभे करायला लावतस देशोधड माणसाला करू नकोस वटी उशाला मानस यशीला, अंगाची आग मुलकान घेतलीय, माय नवसाची जाणीव केली, की सुनासानी ये नवसान की … अशा प्रकारच्या बोद वचनातून समाजाचे प्रबोधन करण्याचे काम ही मंडळी करीत असतात. गल्लीत गेल्यानंतर डोक्यावर घेतलेला देव्हारा खाली उतरून ही कडकलक्ष्मी तोंडावर मुखवटा लावून बालगोपाळांचे मनोरंजन करीत असते.
यावेळी स्वतःच्या अंगावर चाबकाचे फटके मारत बुगुबुगूचा गजर करीत गल्लीतील आयाबायांना बोलवत असते. यावेळी एक श्रद्धेचा भाग म्हणून महिला सुपामध्ये खना नारळाची ओटी व दिवाळीच्या फरलाचे पदार्थ घेऊन देवीची ओटी भरून पूजन करीत असतात. यावेळी अनेक महिला राखणीचा व घरातील प्रापंचिक सुखाचा कौल देवीकडे लावून इच्छा पूर्ण करतात. अशा प्रकारची श्रद्धा ग्रामीण भागात अजूनही आहे



