दुर्मिळ वन्यजीव पाळाल….तर याद राखा…!
महाबळेश्वर वनविभागाची कारवाई, मऊ पाठीचे कासव पाळल्याने हॉटेल मालकावर वन गुन्हा दाखल
महाबळेश्वर (उमेश सुतार) : महाबळेश्वर वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून महाबळेश्वर तापोळा मार्गावरील मौजे हरचंदी मोरेवाडी येथील नीलमोहर ऍग्रो रिसॉर्ट मधील फिश टॅंकमध्ये वन्यजीव असलेले दुर्मिळ मऊ पाठीचे कासव पाळल्याप्रकरणी वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून हॉटेल मालकाला ताब्यात घेतले.
विजय बबन शिंदे रा. हरचंदी मोरेवाडी असे ताब्यात घेतलेल्या हॉटेल मालकाचे नाव आहे. यांच्या ताब्यातून फिश टॅंक मध्ये ठेवलेले मऊ पाठीचे कासव वनविभागाने आपल्या ताब्यात घेतले असून हॉटेल मालकावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत वन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपवनसंरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक वनसंरक्षक महेश झांजुर्णे यांच्या मार्गदर्शनाखाली महाबळेश्वर वनपरिक्षेत्र अधिकारी गणेश महांगडे, तापोळा वनपाल अर्चना शिंदे, महाबळेश्वर वनपाल सहदेव भिसे, वनरक्षक अभिनंदन सावंत, लहू राऊत, विलास वाघमारे, संदीप पाटोळे, रेश्मा कावळे, मीरा कुटे, श्रीनाथ गुळवे, विश्वंभर माळझळकर यांनी केली. पुढील तपास गणेश महांगडे करीत आहेत.




