उत्तरमांडच्या भिंतीला झाडाझुडपांच्या विळख्याने संभाव्य धोक्याची घंटा
लोकसत्य न्यूज

चाफळ /उमेश सुतार : गमेवाडी नजीक आलेल्या उत्तरमांड मध्यम प्रकल्पाच्या भिंतीला मोठ्या प्रमाणात वाढलेल्या विविध झाडाझुडपांचा अक्षरशः विळखा पडला आहे. बेसुमार वाढलेल्या झाडांच्या मुळ्यांपासून या धरणाला संभाव्य धोका निर्माण झाला आहे. मात्र धरण व्यवस्थापनाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली जात आहे.
गतवर्षी महिंद धरणाची संरक्षक भिंत कोसळण्याची घटना घडली होती. अशा घटना इतर धरणांच्या बाबतीत घडू नये त्यासाठी संबंधितांनी तातडीने उत्तरमांडणाच्या भिंतीवर व आजूबाजूला मोठ्या प्रमाणात वाढलेली झाडे झुडपे हटवून संभाव्य धोका टाळावा अशी मागणी पर्यटकांतून होत आहे.
वीस वर्षांपूर्वी गमेवाडी नजीक उत्तरमांड प्रकल्प साकारण्यात आला. धरणाचे काम पूर्ण झाल्यानंतर धरणात 75 टक्के पाणीसाठा करण्यास प्रारंभ झाला. मात्र धरणाच्या भिंतीवर तसेच आजूबाजूला वाढलेली विविध प्रकारची झाडी धरण व्यवस्थापकाकडून काढण्यास वेळोवेळी कचराई केली जात आहे. त्यामुळे या परिसराला मोठमोठ्या झाडाझुडपानी अक्षरशः विळखा घातला आहे. भिंतीच्या खाली व धरणाच्या आतील भिंतीवरही मोठ्या प्रमाणात झाडे वाढली असून झाडाच्या मुळ्या धरणाच्या भिंतीत खोलवर गेल्या आहेत.
धरणाच्या भिंतीवर तसेच आतील भागात बाभूळ, आंबा, करंज, जांभूळ, निलगिरी सुबाभूळ, सागवान अशा विविध प्रकारच्या झाडांनी मिळखा घातला आहे. यासाठी संबंधित विभागाने वेळीस दखल घेऊन भविष्यात धरणाला व धरणाच्या खाली असणाऱ्या गावांना होणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन धरण परसातील झाडी काढून टाकावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त व पर्यटक यांच्या मधून होत आहे.
उत्तरमंड धरणाच्या भिंतीवर बेसुमार वाढलेल्या झाडीमुळे हा संपूर्ण परिसर तळीरामासह प्रेमी युगलांचा अड्डाच बनला आहे. बाहेरून येणारी शालेय प्रेमीयुगले या परिसरात वाढलेल्या झाडाखाली बसून अश्लील चाळे करत असल्याचे दिसून येत आहे तर काही तळीराम रात्रंदिवस धरणाच्या भिंतीवरच तळ ठोकून बसलेले असतात. त्यामुळे धरण परिसरात दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला पहावयास मिळत आहे.



