
चाफळ/उमेश सुतार : तीर्थक्षेत्र चाफळ (तालुका पाटण) येथे ३७८ व्या श्रीरामनवमी उत्सवास चैत्र शुध्द प्रतिपदा गुढीपाडव्यापासून प्रारंभ झाला. उत्सव काळात देवस्थान ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने भाविक रसिकांना मेजवानी मिळत आहे शुक्रवारी गदिमा लिखित गीत रामायणात भाविकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
समर्थ रामदास स्वामींनी चाफळ येथील राम मंदिरात सन १६४८ पासून सुरू केलेला श्रीरामनवमी उत्सव गुढीपाडव्यापासून सुरू झाला आहे. देवस्थान ट्रस्टच्या वतीने मंदिरात भाविकांसाठी रोज आयोजित धार्मिक कार्यक्रमांचा लाभ भाविक घेत आहेत.
चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून एकादशीपर्यंत हा उत्सव सुरू असतो. शुक्रवारी पंडित प्रमोद रानडे व भाग्यश्री अभ्यंकर यांनी ग. दि. माडगूळकर लिखित गीत रामायणाचे उत्कृष्ट सादरीकरण केले, याला रसिकांनी दाद दिली. ट्रस्टचे उपाध्यक्ष दिलीप पाठक यांनी कलाकारांचा सन्मान केला. व्यवस्थापक बा.मा. सुतार यांनी आभार मानले.
उत्सव काळात श्रीराम भजनी मंडळ चाफळ, संत बहिणाबाई विभागीय पारायण गाथा मंडळ कराड व पाटण श्री दाते भजनी मंडळ सातारा श्री विष्णू कृपा भजनी मंडळ सातारा, श्रीनाथ ब्रह्म संगीत भजनी मंडळ कोळेवाडी यांचा भजनाचा कार्यक्रम पार पडला.



