चाफळ/उमेश सुतार : चाफळसह विभागात खरीप हंगामातील सोयाबीन, दारकू, घेवडा या पिकांची काढणी व मळणीची कामे हातघाईवर आहेत. संकलित ज्वारीच्या कणसात दाणे भरू लागल्याने त्यांचे पाखरापासून संरक्षण व्हावे यासाठी शेतकरी गोफ गुंड्याने राखण करत असल्याचे चित्र शिवारातून पहावयास मिळत आहे.
खरीप हंगामाला वेळोवेळी पोषक वातावरण निर्माण झाल्याने यावर्षी सोयाबीन, हायब्रीड, घेवडा, धना, तूर, मुंग या पिकांचे उत्पादन चांगले आहे. भुईमूग, हायब्रीड, ज्वारी, नाचणी, वरी मुबलक उत्पादन मिळाले आहे, पिकांचे काही अंशी नुकसान झाले.
काही ठिकाणी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली याचा परिणाम उत्पादनावर झाला आहे. यावर्षी गहू, हरभरा, भाजीपाला ही उत्पादने करण्यासाठी शेतकऱ्यांचे अधिक कल असल्याचे पहावयास मिळत आहे. विभागात भरपूर पाऊस झाल्याने ज्वारी पिकांची वाढ जोरदार झाली आहे.
सध्या शिवारात पीक काढणे व मळण्याची कामे वेगात सुरू आहेत. वरण राजाच्या रोजच्या आगमनामुळे शेतातील कामे करताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. त्यातच मजुरांचा तुटवडा भासत असल्याने शेतातली कामे करण्यासाठी घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व मंडळी शेतातील कामे करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
सध्या सोयाबीनची मळणी तसेच भुईमूग काढण्याची कामे हातघाईवर आली आहेत. मजुरांचा तुटवडा भासत असल्याने मन धरणी करतच मागेल तेवढा रोज देऊन मजुरांकडून काम करून घेताना दमछाक होत आहे शेतात सध्या रब्बी पेरणी शेळ्या मेंढ्यांचे कळप बसून नैसर्गिक खता साठी शेतकऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत एकंदरीत विभागात खरीप पिकांची कामे अंतिम टप्प्यात आली असली तरी लगोलगच काहींनी रब्बीचे पेरणीचा श्री गणेशा केला आहे रब्बी हंगामातील पेरणीच्या कामाला गती मिळाली आहेत त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसत आहे.
शिवारात संकरित ज्वारीच्या कणसात दाणे भरू लागले असून हे कोवळे दाणे टिपण्यासाठी पाखरांचे थवे पिकावर येत आहेत. शेतकरी पहाटेपासूनच पिकांची राखण करत शिवारात असल्याचे दिसत आहे.




