प्रशालेत महात्मा फुले जयंती साजरी

महर्षीनगर/स्वारगेट (श्री. बी. व्ही. जाधव सर) : गुलटेकडी येथील महाराष्ट्रीय मंडळाच्या कै. कॅ. शिवरामपंत दामले प्रशालेमध्ये महात्मा ज्योतिबा फुले जयंती व शासनस्तरावरील विशेष पट पडताळणी शनिवार,दि.११ एप्रिल रोजी सन्माननीय शिक्षण सहसंचालक श्री. हरून आत्तार साहेब, प्रशासकीय अधिकारी बिबवेवाडी मा.श्री. जयेश शेंडकर सर तसेच समग्र शिक्षा अभियानाच्या मा. सौ.पद्मा मिरजकर मॅडम यांच्या मार्गदर्शनात व मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

दलितांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून विनम्र अभिवादन करण्यात आले. सध्या वार्षिक परीक्षा सुरू असल्याने सन्माननीय प्रशासकीय अधिकारी वर्ग यांनी विद्यार्थी व वर्गभेट देत विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

शासन स्तरावरील विशेष पट पडताळणी उपक्रमांतर्गत सन्माननीय प्रशासकीय अधिकारी वर्ग व मा.मुख्याध्यापक श्री. रमेश वसईकर सर यांनी वर्ग व शाळा पाहणी करून शालेय कामकाजात विद्यार्थ्यांचे हजेरी पत्रक, जनरल रजिस्टर, शालेय परीक्षा नियोजन, व्यवस्थापन व प्रश्नपत्रिका, विद्यार्थी उपक्रम नोंदवह्या, यु-डायस प्लस पोर्टल प्रणाली आदी अद्ययावत कार्यालयीन कामकाजाची तपासणी केली.

प्रशालेमध्ये शैक्षणिक वर्षात राबवण्यात येत असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली व शालेय उपक्रम, शालेय कामकाज तसेच व्यवस्थापनाबद्दल विशेष कौतुक करत सन्माननीय प्रशासकीय अधिकारी यांनी शालेय सदिच्छा भेट नोंदवहीत उत्तम शेरा देत शुभेच्छा संदेश दिला.
यावेळी प्रशालेचे मा. मुख्याध्यापक श्री.वसईकर सर यांच्या मार्गदर्शनाने प्रशालेचा विशेष पट पडताळणी उपक्रम शिक्षकांच्या व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या पार पडला. माननीय मुख्याध्यापक यांनी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे कौतुक केले.

