महात्मा गांधी विद्यालयाची माजी विद्यार्थीनी

राजगुरुनगर / लतीफ शाह सर : येथील प्रांजली सावंत हिने एम.पी.एस.सी.परीक्षेत इतर मागास वर्ग महिला प्रवर्ग गटात राज्यात प्रथम क्रमांकाचे उत्तुंग यश संपादन केले असून तिची कर सहायक या पदासाठी निवड झाली आहे.
प्रांजली ही महात्मा गांधी विद्यालयाची सन २०१८ च्या एस.एस.सी बॅचची विद्यार्थीनी आहे. कोणत्याही प्रकारचा खासगी क्लास न लावता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत तिने हे यश संपादित केले आहे.

प्रांजली म्हणाली की माझ्या या यशामध्ये खेड तालुका एज्युकेशन सोसायटी आणि महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मोलाचे योगदान आहे. अभ्यासाची खरी आवड मला शालेय जीवनापासूनच निर्माण झाली. स्वयं अध्ययन व वेळेचे नियोजन यामुळेच मला हे यश संपादन करता आले. माझ्या या यशामध्ये माझी आई व भावाचे अविरत परिश्रम आहेत.
प्रांजलीच्या यशाबद्दल खेड तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, उपाध्यक्ष अजित लुणावत, मानद सचिव एअर कमोडर गणेश जोशी, सर्व संचालक मंडळ, व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे, प्राचार्या संध्या कांबळे, अधिकारी वर्ग, शिक्षकवृंद यांनी अभिनंदन केले आहे.

