
राजगुरुनगर/लतिफ शाह सर : येथील खेड तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ‘बारावी नंतरचे करिअर’ या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते.
संस्थेच्या बाफना रंगमंदिराच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्याख्यानासाठी बारावीचे विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

यावेळी संस्थेच्या संचालिका उर्मिलाताई सांडभोर, व्यवस्थापकीय अधिकारी कैलास पाचारणे, प्राचार्या संध्या कांबळे, उपमुख्याध्यापिका रेखा जाधव, कनिष्ठ महाविद्यालयाचे विभाग प्रमुख दशरथ पिलगर, पर्यवेक्षक लतीफ शाह, सुनीता ठाकूर, संदेश जाधव उपस्थित होते.

करिअर मार्गदर्शक व समुपदेशक विवेक वेलणकर म्हणाले की मेडिकल व इंजिनिअरिंग शिवाय बारावी शास्त्र शाखेनंतर अनेक अनेक पर्याय उपलब्ध आहेत. पशुवैद्यक, आर्किटेक्चर, बायोटेक्नॉलॉजी, संशोधन क्षेत्र, संरक्षण क्षेत्र, अॅग्रिकल्चर, फार्मसी, गणित व संख्याशास्त्र या क्षेत्रांमध्येही उत्तम करिअर होऊ शकते. पालक व विद्यार्थ्यांनी अशा परीक्षा व अभ्यासक्रमाची माहिती घेऊन आपल्या पाल्याच्या दृष्टीने ध्येय निश्चित करावे.

पर्यवेक्षक संदेश जाधव यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. माधुरी हुंडारे यांनी सूत्रसंचालन केले. दीपक वाळुंज यांनी आभार मानले. शीला नाईकरे यांनी संयोजन केले.

